गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- चेअरमन यशराज देसाई. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा 52 वा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न.
दौलतनगर दि.03:-
लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखाचे संचालक मंडळ आर्थिक शिस्त ठेऊन काम करत असून सभासदांवर कर्जाचा
बोजा होणार नाही या धोरणाला प्राथमिकता देण्यात आली आहे. गत काही वर्षामध्ये ऊस
दराचा पहिला हप्ता देण्याच्या रकमेमध्ये आपण प्रतिवर्षी वाढ करत असून यावर्षी
जिल्हयातील इतर कारखान्यांनी अद्यापही ऊसाचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात धोरण
जाहिर केले नसल्याने इतर कारखान्यांचे बरोबरीने पहिला हप्ता देण्याचा निर्णय
संचालक मंडळ गळीत हंगाम सुरु करताना घेईल.त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस
उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास गळीतास
देऊन सन 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे
आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई
यांनी केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ च्या ५२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि-प्रदीपन
समारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना कारखान्याचे
चेअरमन यशराज देसाई यांनी कारखान्याची आर्थिक स्थिरता आणि आगामी हंगामासाठीचे
सकारात्मक धोरण स्पष्ट केले. या प्रसंगी मोरणा शिक्षण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.
श्री. रविराज देसाई,जयराज देसाई,आदित्य देसाई, डॉ.दिलीपराव
चव्हाण,डी.पी.जाधव,अशोकराव पाटील,मिलिंद पाटील, बबनराव शिंदे, सोमनाथ
खामकर,पांडूरंग नलवडे,शशिकांत निकम,प्रशांत पाटील,विजय सरगडे, भरत साळुंखे,
चंद्रकांत पाटील, विजय पवार, संतोष गिरी, दिपाली पाटील,जयश्री कवर, कार्यकारी
संचालक सुहास देसाई यांचेसह कारखान्याचे संचालक,सर्व पदाधिकारी, कारखान्याचे
सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक श्री.सर्जेराव
लक्ष्मण जाधव व त्यांच्या पत्नी सौ. रुपाली सर्जेराव जाधव यांचे
हस्ते सत्यनारायण महापुजा संपन्न झाली.
चेअरमन
यशराज देसाई यांनी सांगितले की, संचालक मंडळाच्या धाडसी निर्णयामुळे कारखान्याने
मोठी आर्थिक मजल मारली आहे. जिल्हयातील इतर कारखान्यांचे कार्यक्षेत्रामध्ये
आडसाली ऊसाचे प्रमाण हे जास्त असून आपल्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आडसाली
ऊसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे पहिल्या दिवसापासून आपल्याला 11 ते 12 महिन्याच्या
ऊसाचे गाळप करावे लागत असल्याने याबाबींचा विचारही आपल्याला केला पाहिजे.शेतकऱ्यांना
चांगला ऊस दर मिळावा,त्यांना न्याय देण्यासाठी शासनाने एफ.आर.पी.चे धोरण आणले.
आपले कारखान्याला केवळ एफआरपी देण्यासाठी दरवर्षी उचलावे लागणारे कर्ज गेल्या
दोन-तीन वर्षांत संपूर्णपणे परतफेड करण्यात आले आहे. तसेच, दोन वर्षांपूर्वी
केलेल्या विस्तारीकरणामुळेच गेल्या वर्षी कारखाना ९६ दिवसांमध्ये २ लाख ५ हजार
मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करू शकलो आणि तोडणी वाहतुकीचे एकही रुपयाचे कर्ज
शिल्लक राहिले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी मंजूर केलेल्या ₹१६ कोटी रुपयांच्या भागभांडवलामुळे कारखान्यावरील व्याजाचा
बोजा कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. ऊस दराबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट करताना
चेअरमन देसाई म्हणाले की, यावर्षी देखील इतर कारखान्यांच्या बरोबरीने पहिला हप्ता
देण्याचा निर्णय निश्चितपणे गळीत हंगाम सुरू करताना घेतला जाईल. मागील वर्षी
एफआरपीची १००% रक्कम सप्टेंबरमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले
होते. कर्मचारी आणि यंत्रणा व्यवस्थापनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना
ते म्हणाले की, कर्मचारी हिताला प्राधान्य देत गेल्या दोन वर्षांत अनेक
कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात आली आहे. याशिवाय, २००५ पासूनची रिटेन्शन अलाऊन्सची
थकबाकी तसेच थकीत १८% वाढीव फरक पगारची रक्कमही कर्मचाऱ्यांना अदा करून त्यांना
न्याय दिला आहे. तोडणी वाहतुकीसाठी यंत्रणा मिळवण्यास येणाऱ्या अडचणींवर मात
करण्यासाठी जिल्ह्याच्या इतर कारखान्यांच्या बरोबरीने सर्वाधिक दर देण्यात आला
आहे. ऊस वेळेत उपलब्ध होण्यासाठी कारखान्याच्या मालकीच्या अंगद गाड्यांची संख्या
१६ वरून १९० पर्यंत वाढवण्यात आली असून हा गळीत हंगामाचेदृष्टीने सर्व तयारी
पूर्णत्वाकडे गेली असून आवश्यक तेवढी ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी योग्य ते
नियोजन केले आहे. त्यामुळे गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील
सभासदांनी १००% ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन चेअरमन
यशराज देसाई यांनी यावेळी केले. तसेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कारखान्यातील सर्व
अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

Comments
Post a Comment