दौलतनगर-मरळी येथे आरटीओ कॅम्प; 80 जणांची ड्रायव्हिंग टेस्ट, 68 लर्निंग लायसन्सचे वितरण
दाैलतनगर, दि. 8 : प्रतिनिधी
पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, कराड यांच्या वतीने दौलतनगर-मरळी (ता. पाटण) येथे मंगळवारी आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये 80 नागरिकांच्या ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आल्या, तर 68 लर्निंग लायसन्सचे वितरण करण्यात आले. त्यामुळे आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना कराडपर्यंत जाण्याची होणारी गैरसोय काही प्रमाणात कमी झाली.
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार हा कॅम्प आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या उपस्थितीत कॅम्पच्या कामकाजाला सुरुवात झाली.
आरटीओ विभागाच्या विविध सेवा ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. विशेषतः शिकाऊ वाहनचालक परवाना तसेच वाहनचालक परवान्याशी संबंधित प्रक्रियेसाठी नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळपासूनच दौलतनगर-मरळी परिसरात नागरिकांची उपस्थिती होती.
या वेळी प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री. दीपक वाघुले (प्रादेशिक परिवहन अधिकारी), श्री. विजय इंगवले (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी), श्री. चैतन्य कणसे (मोटार वाहन निरीक्षक), श्री. अविनाश सूर्यवंशी (मोटार वाहन निरीक्षक), श्री स्वप्नील कदम (मोटार वाहन निरीक्षक), श्रीमती रजनी पाटोळे (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), श्री. योगेश कुंभार तसेच चालक श्री. विकास साळुंखे यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
दौलतनगर येथे हा आरटीओ कॅम्प दर महिन्याला आयोजित करण्याचे नियोजन असल्याने पाटण तालुक्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक सुलभपणे मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना परवाना प्रक्रियेसाठी वारंवार शहरात येण्याची आवश्यकता कमी व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments
Post a Comment